तार चोरीमुळे पिकांचे मोठे नुकसान; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी:
भालेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी वीज तार चोरी केल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले. तार चोरीमुळे पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही आणि परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित वीज विभागाकडून चोरीस गेलेली वीज तार पुन्हा बसवण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांनी केलेले आर्थिक नुकसान भरून न निघणारे असल्याची भावना व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे भालेगाव परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून, वारंवार होणाऱ्या तार चोरीमुळे शेती करणे अधिकच कठीण बनले आहे. पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शेतकऱ्यांनी केवळ वीज तार पुन्हा बसवून प्रशासनाने जबाबदारी झटकू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वीज तार चोरीमागे नेमका कुणाचा हात आहे, ही चोरी कुणाच्या संगनमताने करण्यात आली का, याचा सखोल तपास करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
तसेच अशा घटना वारंवार घडत असल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे अशक्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलेश नारखेडे यांनी दिला. भालेगाव शिवारातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघटनेचा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
