बंदला अनेक प्रवासी संघटनांनी दिला पाठिंबा, शासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष
साईमत।चोपडा।प्रतिनिधी।
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्यस्तरावरील तेरा संघटनेची कृती समितीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार हा संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संपाच्या ठिकाणी प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिल्यावर बस आगार हे मंगळवारी अंशतः सुरू दिसून येत होते. काही प्रवासी स्थानकावर ताटकळत बसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी शुकशुकाट होता. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आमच्या मागण्यांचा पाठपुरावा संघटनेमार्फत वेळोवेळी केलेला असतानाही शासनाने त्या मागण्या पूर्ण न करत त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करत आहोत. बंदला अनेक प्रवासी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, असेही ते म्हणाले.
बस बंद असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शाळेतून घरी जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गाकडूनही व्यक्त केली जात होती. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, त्यांच्या मागण्यांवर तोडगा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशा आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
प्रमुख मागण्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, वेतन वाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयां मधील शिल्लक रकमेचे वाटप करावे, नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार आणि अडीच हजार रुपयां ऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत, २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढ मिळावी, ५८ महिन्यांचा कालावधीची वार्षिक वेतन वाढीची तकबाकी मिळावी, ५७ महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
गणपतीसाठी ३० गाड्या कोकणाकडे रवाना
कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, शहराध्यक्ष नंदकुमार सांगोरे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा असल्याचे सांगितले. आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी सांगितले की, काही संघटना संपात सहभागी नसल्याने गणपतीसाठी ३० गाड्या सायंकाळपर्यंत कोकणाकडे रवाना होत आहेत.