राज्यभरातील ५३५ खेळाडूंचा सहभाग निश्चित
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावात सोमवारी, ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे स्पर्धा ४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. जळगावच्या स्पर्धेसाठी विविध गटांचे मानांकन राज्य असोसिएशनने जाहीर केले आह. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू व अर्जुन पुरस्कार मिळविणारी मधुरिका पाटकर (ठाणे) हिला महिला गटात अव्वल मानांकन मिळाले आहे. रेगन अलबुकर (पुरुष गट, मुंबई उपनगर), १९ वर्ष वयोगट मुले- कुशल चोपडा (नाशिक) मुली- अनन्या चांदे (मुंबई उपनगर), १७ वर्ष वयोगट मुली- नायशा रेवस्कर (पुणे), मुले- पार्थ मगर (मुंबई शहर), १५ वर्ष वयोगट मुले- मयुरेश सावंत (ठाणे), मुली- नायशा रेवस्कर (पुणे), १३ वर्ष वयोगट मुली- मायरा सांगळेकर (मुंबई उपनगर), मुले- झेन शेख (मुंबई उपनगर), ११ वर्ष वयोगट मुले – यशान कोलाह (मुंबई शहर), मुली- आद्या बाहेती(परभणी) या खेळाडूंना प्रथम मानांकन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सिद्धेश पांडे, दीपित पाटील, निल मुळे, पृथा वर्तिकर, रिशा मिरचंदानी, दिव्यांशी भौमिक, काव्या भट, श्रुती अमृते, जश मोदी या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.त्यांना विविध गटात मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्त जळगावकरांना ह्या नामांकित खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
एकलव्य क्रीडा संकुलातील इंडोअर हॉलमध्ये आठ टेबल यासाठी लावण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यभरातील ५३५ खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये यजमान जळगावसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, धुळे येथील खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. राज्य असोसिएशनतर्फे दरवर्षी पाच राज्य स्पर्धा घेण्यात येतात. त्यापैकी ही ह्या वर्षाची ही चौथी स्पर्धा आहे. सर्व गटातील विजयी, उपविजयी तसेच उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत पात्र खेळाडूंना राज्य असोसिएशनने दिलेल्या तक्त्यानुसार रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्य असोसिएशनच्या नियम व अटीनुसार सामने खेळविण्यात येतील.
यांचे लाभतेय सहकार्य
स्पर्धेला आमदार राजुमामा भोळे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर ह्यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धा आयोजना संदर्भात जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सल्लागार प्रा. चारुदत्त गोखले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, खजिनदार संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव राजु खेडकर, क्रीडा संघटक नितीन बर्डे, रवींद्र धर्माधिकारी, ॲड. विक्रम केसकर, अमित चौधरी, अमित शर्मा, शैलेश जाधव, विजय विसपुते, भरत मतानी आदी परिश्रम घेत आहेत.