विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी एसटी प्रवास आता डिजिटल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधा आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेत ‘RuPay ON THE GO enabled with NCMC’ कार्ड प्रकल्पास अधिकृत मंजुरी दिली आहे. सध्या सवलतीचे पास हस्तलिखित पद्धतीने दिले जात असताना, या नव्या कार्डमुळे सवलत व विनासवलत प्रवाशांसाठी एकत्रित, सुरक्षित आणि पूर्णपणे डिजिटल प्रवास प्रणाली लागू होणार आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत क्र. ३०७ (दि. ७ मे २०२५) ठराव क्र. २०२५:०५:१९ नुसार हा प्रकल्प मान्य करण्यात आला असून, राज्यभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. Me. eBix Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या सहकार्याने पर्सनलाइज्ड कार्ड वितरीत केले जाणार आहे. हे कार्ड ‘अहस्तांतरणीय’ असून प्रवाशाचे नाव व फोटो छापलेले राहील.
कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये
-
सवलतींचा समावेश – शासनमान्य सर्व सवलतींची माहिती कार्डवर नोंदवलेली राहील.
-
ऑनलाइन वॉलेट – मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, यूपीआय या माध्यमांतून रक्कम टॉपअप करून आरक्षण किंवा इतर व्यवहार करता येतील.
-
ऑफलाइन वॉलेट – थेट बसमध्ये तिकीट खरेदीसाठी वापरता येईल; सवलतीचे तिकीट काढण्यासाठी आवश्यक शिल्लक बंधनकारक.
कार्डधारक आणि नोंदणी प्रक्रिया
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती व गंभीर आजारग्रस्त रुग्ण अशा सर्व सवलतधारकांना कार्ड उपलब्ध होईल. दिव्यांगांसाठी UDID कार्डद्वारे नोंदणी, विद्यार्थ्यांसाठी रु. ५ अर्ज शुल्क आणि सरल/PEN क्रमांक आवश्यक राहणार आहेत. नोंदणी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे पूर्ण होईल.
राज्यभरातील २५१ आगार, सुमारे ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष व ३०००+ अधिकृत एजंट नोंदणी व वितरणासाठी कार्य करतील. नोंदणी नंतर ३० दिवसांत कार्ड छापून संबंधित आगारात पाठवले जाईल. कार्ड उपलब्ध होताच एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल, आणि POS मशिनद्वारे अॅक्टिवेशन करून कार्ड वितरीत केले जाईल.
शुल्क आणि टॉपअप प्रणाली
-
नव्या लाभार्थ्यांसाठी कार्डाची किंमत: रु. १११ (सर्व करांसह)
-
पूर्वीच्या स्मार्टकार्डधारकांसाठी: रु. १४१/१४९
-
हरवल्यास/खराब झाल्यास नवीन कार्ड: रु. १९९
-
टॉपअपसाठी किमान रु. ५०; ०.१% सुविधा शुल्क + GST लागू
-
१८ वर्षांवरील कार्डधारकांना ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही वॉलेट, तर १८ वर्षांखालीलांना फक्त ऑफलाइन वॉलेट
प्रवाशांसाठी नियम व अटी
प्रवासादरम्यान कार्ड प्रवाशासह असणे बंधनकारक असून, तिकीट नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल. विभागीय अधिकाऱ्यांना तपासणीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.एकंदरीत, ‘RuPay ON THE GO – NCMC’ कार्ड प्रकल्पामुळे एसटी प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल होईल. तसेच सवलतधारक प्रवाशांसाठी प्रक्रिया सुलभ होणार असून, प्रवासातील तांत्रिक व व्यवहारिक अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होतील.
