शिबिरात तपासणीचा सहभागी ७७ जणांनी घेतला लाभ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
एम. जे. कॉलेज सोहम योग विभार, धात्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क शुगर, बी.पी. व कराडा स्कॅन तपासणी शिबिर २८ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. दुपारी ३ ते ६ या वेळेत शिबिराला शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी, केसीई सोसायटी येथील सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला. शिबिरासाठी ७७ सहभागी तपासणीसाठी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकाची नोंदणी करून त्यांचे बीपी, मधुमेह चाचणी, कराडा स्कॅनमधून शरीरातील फॅटचे प्रमाण, वजन, जलांश, बीएमआर आदी तपासून वैयक्तिक अहवाल दिला गेला. तपासणीनंतर प्रत्येक सहभागीला वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. गणेश पाटील आणि डॉ. हर्षदा पाटील यांनी तपासणी करून दोषानुसार आहार, पचनशक्ती वाढविण्याचे उपाय आणि औषधी वनस्पतींचा उपयोगावर माहिती दिली. तपासणी अहवाल हातात मिळताच तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे सहभागी समाधानी दिसून आले.
यशस्वीतेसाठी एम. जे. कॉलेजचे प्राचार्य संजय ना. भारंबे, सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंकज खाजबागे, डॉ.ज्योती वाघ, डॉ.श्रद्धा व्यास, धात्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकमधील सहकारी, आणि सोहम योग विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
