साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
बहुभाषिक ब्राह्मण समाज व भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे ५ मे रोजी कृष्णा क्लिनिक येथे भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रथमच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रक्तदान शिबिरात प्रत्येकाला रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. शिबिरास समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ७५ युनिट रक्त संकलन झाले. विशेष म्हणजे शिबिरात महिलांनीही रक्तदानासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
रक्त संकलनासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तकेंद्राचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते. भर उन्हाळ्यात रक्तासाठी रुग्णांकडून मोठी मागणी होते. त्यात बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे तब्बल ७५ युनिट संकलन होणे म्हणजे एक प्रकारे ही रुग्णांना संजीवनी देणारे काम बहुभाषिक ब्राह्मण समाजाकडून झाले आहे. यापुढेही रक्तदानाचे काम सातत्याने करत रहा, जेणेकरून गरजू रुग्णांना मदत होईल, असे सांगत बहुभाषिक ब्राह्मण समाजाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक रक्तपेढीच्या डॉक्टरांनी केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बहुभाषिक ब्राह्मण समाजातील सर्व नागरिक उपस्थित होते.