साईमत, जामनेर : प्रतिनिधी
स्वामी नरेंद्र महाराज यांचे हिंदू धर्माचे कार्य देशभरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराजांचे अध्यात्मिक कार्य सोबत विविध सामाजिक उपक्रम संस्थानमार्फत राबवित असतात. जामनेर शहरात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा योग जिल्हाभरातील माऊली भक्तांना मिळाला आहे. सोशल मीडियाच्या गर्तेतही धार्मिक कार्यक्रमात भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. हिवरखेडा रस्त्यावरील गोविंद महाराज संस्थानच्या ग्राउंडवर जळगाव जिल्हा सेवा समितीमार्फत आयोजित श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता.
जामनेरपुरा येथून नगारखाना, गांधी चौक, नगरपालिका चौक भुसावळ चौफुली, हिवरखेडा रोड यामार्गाने माऊलींच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभरात पादुका गुरू पूजन, पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन आरती, माऊलींचे ऑनलाइन प्रवचन, उपासक दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम घेण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गरजू १५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू शेतकऱ्यांना ४५ फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक बाबुराव हिवराळे, गोविंद अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते मोनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा सेवा समिती तसेच जामनेर तालुका समिती आणि माऊली भक्तांनी परिश्रम घेतले.