
काव्यसंमेलनाप्रसंगी प्रा.किसन वराडे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
बोलीभाषा ह्या मानवी भावभावनांचे सहजोद्गार असतात. त्या उपजतच आत्मसात केल्या जातात. बोलीचे प्रकटीकरण सहजरित्या होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन वराडे-अंबरनाथ यांनी केले. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई पुण्यतिथीनिमित्त लेवागणबोली दिनानिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडतर्फे ‘ओवी गाई बहिणाबाई’ काव्यसंमेलन आयोजित केले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) होते. त्यांनी भाषणातून अशा प्रकारची संमेलने सातत्याने होत राहिली तर बोली भाषांच्या संवर्धनाला मोलाची मदत होईल, असे बहिणाबाईंची बोलीभाषा टिकवायची तिचे संवर्धन करायची जबाबदारी यापुढील साहित्यिकांनी समर्थपणे सांभाळावी, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, केंद्रीय अध्यक्ष प्रकाशराव पाटील, बहिणाई प्रदेशाध्यक्ष आशा कोल्हे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी एका साहित्यिक महिलेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्याच्या हेतूने झालेल्या ठरावानुसार प्रथम वर्षाचा पुरस्कार प्रा.संध्या महाजन यांना देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक तसेच लेवागणबोलीचे अभ्यासक अरविंद नारखेडे यांच्या ‘खयमाना’ पुस्तकाचे प्रकाशन काव्यसंमेलनात करण्यात आले.
काव्यसंमेलनाला बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती सून स्मिता चौधरी तसेच परिसरातील ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड, ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर, प्रा.डाॅ.जतिन मेढे, अ.फ.भालेराव, राजेंद्र रायसिंग, प्रा.डाॅ. श्रीकांत तारे, महासंघाच्या पदाधिकारी हर्षा बोरोले, वैशाली झोपे उपस्थित होत्या. तसेच काव्यसंमेलनाला परिसरातील तब्बल ४५ कवीवर्य आणि कवयित्री यांचा सहभाग लाभला. काव्यसंमेलनाला माजी महापौर सीमा भोळे यांचे सौजन्य लाभले. काव्यसंमेलनाचे संयोजन प्रा.संध्या महाजन, सुनिता येवले नारखेडे यांनी केले.
यशस्वीतेसाठी सुरेश फालक, अविनाश भोळे, उमाकांत जावळे, स्वाती भोळे, नयना जावळे, मनीषा पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक केंद्रीय अध्यक्ष प्रकाश पाटील, सूत्रसंचालन ज्योती राणे तर आभार प्रा. वंदना नेमाडे-महाजन, डॉ. डिंपल पाटील यांनी मानले.


