क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव पल्सरची दुभाजकाशी जोरदार धडक
साईमत /मुक्ताईनगर/प्रतिनिधी : –
मलकापूरकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. पिंपरी अकाराऊत शिवारात भरधाव वेगातील पल्सर दुचाकी अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तिन्ही तरुणांना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी पल्सर दुचाकी (क्र. एमएच ५४ – १४०६) मलकापूर येथून मुक्ताईनगरच्या दिशेने अतिशय वेगात जात होती. पिंपरी अकाराऊत गावाजवळील सरळ रस्त्यावर अचानक चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वेग अधिक असल्याने चालकाला गाडी सावरणे शक्य झाले नाही आणि काही क्षणांतच दुचाकी जोरात रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी जमा झाले.
अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. तिन्ही तरुण रस्त्यावर पडलेले असून वेदनेने विव्हळत होते. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही स्थानिक तरुणांनी व प्रवाशांनी माणुसकी दाखवत तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी जखमींना उचलून रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी नेले व उपलब्ध साधनांच्या मदतीने प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलिसांना व रुग्णवाहिकेला तत्काळ माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमी तिन्ही तरुणांना उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून पुढील उपचारांसाठी त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
दरम्यान, महामार्गावर वाढलेला वेग, निष्काळजी वाहनचालक आणि सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा अपघातांच्या घटना सातत्याने घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे ‘वेगावर नियंत्रण ठेवणे व वाहतूक नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे’ हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलिसांनी अपघाताबाबत पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
