नातेवाईकांनी केला खूनाचा आरोप, रुग्णालयात केला आक्रोश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेले दोन तरुण गुरुवारी, ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीने जळगाव शहराकडे येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाचा उपचारावेळी मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा अपघात नसून नियोजित कट आहे. अपघाताचा बनाव करत खून केल्याचा धक्कादायक आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, असोदा येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८) या तरुणाचे जळगाव शहरात कपड्याचे दुकान आहे. गुरुवारी, ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो मित्र जावेद जाकिर पटेल (वय २९, रा.असोदा) याच्यासह दुचाकीने जळगावला येत होता. त्यावेळी एका भरधाव कार चालकाने धनाजी पेट्रोल पंपाजवळील खारी डोहाजवळ त्यांना धडक दिली.
उपचारावेळी दुचाकी चालकाचा मृत्यू
अपघातात चारचाकीचे चाक छातीवरून गेल्याने मोहम्मद इब्राहिम खाटीक हा गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. इब्राहिमच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.