साईमत, बोदवड : प्रतिनिधी
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे, सर्व श्रेष्ठ असे संविधान आहे. परंतु अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ व अनेक रूढी-परंपरा या सर्वांना न्याय देणारे व सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणारे संविधान आहे. त्यात वेळ, काळानुरूप दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान हे नेहमी नव्या युगाचे नायक आहे. आज देशातील सर्व कायद्याचे व भविष्यात होणाऱ्या सर्व कायद्याचे संविधान उगमस्थान असल्याचे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी केले. संविधान दिनानिमित्त बोदवड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना निर्मिती विषयावर ॲड. धनराज प्रजापती यांनी विचार मांडले. तसेच ॲड.पी.आर.मोझे, ॲड. के.एस. इंगळे, ॲड. संतोष कलंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड न्यायालयाचे न्या.क्यु.यु.एन शरवरी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संविधानाचे पूजन व उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास ॲड.सुनील जाधव, ॲड.सी. के. पाटील, ॲड.मुकेश पाटील, ॲड.वैभव पाटील तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी, अधीक्षक वैभव तरटे, कार्यक्रम समन्वयक शैलेश पडसे, वकील पक्षकार उपस्थित होते.