मुंबई : प्रतिनिधी
येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षांच्या या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उत्तर दिले.एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस म्हणाले, शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले जाईल आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ही खूप गंभीर गोष्ट आहे. फडणवीसांना माहिती आहे की, शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना खात्री आहे की, शिंदे आता अपात्र ठरणार आहेत. तरी अपात्र ठरल्यावर आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पद टिकवू असे फडणवीस म्हणतायत. म्हणजेच, तुमच्याकडे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद टिकवायला तोडगा आहे परंतु, मराठा आरक्षणावर तोडगा नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत.त्यांचे आंदोलन सुरू आहे. तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही.शिंदे आणि त्यांच्या टोळीला वाचवायला तोडगा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मात्र तुम्हाला सोडवता येत नाही.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतरही विधान परिषदेवर आमदार होतील परंतु त्या ४० आमदारांचे काय? त्या प्रत्येकाला तुम्ही विधान परिषदेवर घेऊन घटनाबाह्य पद्धतीने राज्य करणार आहात का? देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी अपात्र ठरल्यानंतरही तुम्ही त्यांना विधान परिषदेवर घेणार आणि मंत्रीपद टिकवणार, याचा अर्थ तुम्ही कायदा, संविधान आणि नितीमत्ता मानायला तयार नाही. भाजपा नितीमत्तेच्या बाबतीत खाली घसरली आहे. भाजपावाले सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकायला तयार नाहीत. ही कसली मस्ती आहे? याला माज म्हणतात. देशातली जनता तुमचा हा माज २०२४ साली उतरवेल. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालून राज्य करणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.