इतना सन्नाटा क्यू है, भाई!

0
18
इतना सन्नाटा क्यू है, भाई!-www.saimatlive.com

साईमत विशेष प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यावर विधानसभानिहाय प्रभारी नेमण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोपविली आहे. त्यानुसार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची चाचपणी सुरु झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात त्यातल्यात्यात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रात ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यात कमालीची सामसूम दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून ही सामसूम दिसत असली तरी जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लेखाजोखा मागितला जात असल्याने अनेकांना अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या तीघही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत खोके-गद्दार विरुध्द खुद्दार अशा पध्दतीने शिवसैनिकांची लढाई होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तथापी या तीनही विधानसभा मतदार संघातून शिंदे सेनेच्या अनुक्रमे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चिमणराव पाटील व आ.किशोरअप्पा पाटील यांनी भाजपाच्या स्मिताताई वाघ यांनी आपआपल्या मतदारसंघातून लीड दिल्याने शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार करण पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या लोकसभा मतदारसंघातील अमळनेरमधून राष्ट्रवादीचे मंत्री ना.अनिलदादा पाटील, चाळीसगावमधून भाजपाचे आ.मंगेशदादा चव्हाण व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ.राजूमामा भोळे यांनीसुध्दा आपआपल्या कार्यक्षेत्रातून भाजपाला मताधिक्य दिल्याने करण पवार अधिक फरकाने पराभूत झाले. दरम्यान, इतर राजकीय पक्षात विशेषत: भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात आगामी विधानसभा निवडणूकीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातील ठाकरे गटाच्या वाटेला जाणाऱ्या महाविकास आघाडीतील जागा कुठे सुटतील हे स्पष्ट नसल्याने शिवसेना ठाकरे गटात फारसा उत्साह दिसून येत नाही. पण लोकसभेच्या पराभवाने काही प्रश्न पक्षीय पातळीवर निर्माण झाले असून यामध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व डॉ.हर्षल माने या प्रमुखांसह पक्षाचे उपजिल्हा प्रमुख लोकसभा मतदार संघातील मनपा व नगरपालिका क्षेत्राचे मावळते नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्या या सर्वांच्या कामाकाजाचा आढावा वरिष्ठ पातळीवर घेतला जात असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीसाठी उत्साही असलेल्या इच्छुकांना मात्र याचा जाब आगामी काळात द्यावा लागेल, यात शंका नाही.

प्रभावी पदाधिकाऱ्यांनी केली निराशा
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूकीसाठी शिवसेना उबाठा गटाकडून गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीसाठी तयार असलेले माजी उपमहापौर डॉ.सुनिल महाजन, कुलभुषण पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे व महानगर जिल्हाध्यक्ष शरद आबा तायडे यांच्या निवडणुक कामगिरीचे मूल्यमापन पक्षाकडून होत असून यामध्ये मेहरुण व पिंप्राळा भागातून फक्त सुनिल महाजन व कुलभुषण पाटील यांची सरस कामगिरी दिसत असल्याने विष्णू भंगाळे, शरद तायडे यांच्यासह नितीन लढ्ढा, नितीन बरडे, नितीन सपके, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर अशा अनेकांच्या अपयशी कामगिरीची पक्षाने दखल घेतल्याने सुध्दा काही मंडळी चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मावळते महापौर जयश्री महाजन यांनी प्रचारा दरम्यान घेतलेली मेहनत सर्वश्रृत असून त्यांनी शहरातील गल्लोगल्ली व थेट घराघरातील महिलांपर्यंत अत्यंत नियोजनाने मशाल पोहचून सुध्दा शहरात अपेक्षित मतदान मिळाले नाही.


शिवसेना पक्षात कधीही सन्नाटा नसतो. लोकसभा निकालाचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत चिंतन सुरू आहे. तथापि महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित झाल्यावर आगामी निवडणुकीची रणनिती निश्चित करून सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागतील.
संजय सावंत
संपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जळगाव

 

 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here