मुंबई ः
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. या ‘जागर यात्रे’वरून शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे.
मनसेच्या ‘जागर यात्रे’ दरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली तर मनसेचे एकाचे दोन आमदार होतील, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. जागर यात्रेतून राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान नको, असेही त्यांनी म्हटले आहे. सय्यद यांनी ट्वीट करत ही टोलेबाजी केली आहे.
दीपाली सय्यद ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मनसेच्या ‘जागर यात्रे’ने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल पण यात्रेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली तर एकाचे दोन आमदार होतील आणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील. यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको. देशपांडेना (मनसे नेते संदीप देशपांडे) अजूनही डॉक्टरांची गरज आहे. ते लवकरच बरे होतील. कोणी व्हिल चेअर मागवा रे!”
विशेष म्हणजे यापूर्वीही दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं होतं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, असे वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले होते.