साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागु होणाऱ्या विविध बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने सजग राहून संशोधन वृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ.एस.एम. गायकवाड यांनी केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ‘New Frontiers in Biological Sciences NFBS -२०२३’ विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करतांना ते बोलत होते. तसेच वनस्पती आणि प्राणीशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, संशोधनाच्या नवीन विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत संपूर्ण भारतातून १२५ संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यापैकी ५४ संशोधकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, कबचौ उमवि जळगावचे वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.एम.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते तसेच संयोजन समिती प्रमुख प्रा. डॉ.विद्या पाटील, प्रा. डॉ. मनोजकुमार जाधव उपस्थित होते.
पोस्टर, पीपीटी प्रेझेन्टेशनचा निकाल असा
परिषदेत शोध निबंध स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरणासाठी पोस्टरमध्ये प्रथम खुशबू तडवी, द्वितीय शेख मेहविश मो.सलीम, प्रज्ञा साळुंखे, तृतीय शेख उझ्मा नाज शेख इकबाल तसेच पीपीटी प्रेझेन्टेशन सादरीकरणासाठी प्रथम प्रा.डॉ.एस.वाय.पाटील, द्वितीय प्रा.डॉ.आनंद जाधव, तृतीय प्रा.डॉ.एम.एस.पाटील अशा विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ.एम.बी.पाटील, प्रा.डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डॉ.एस.ए.पाटील, प्रा.डॉ.तन्वीर खान यांनी काम पाहिले. प्रास्ताविक परिषदेचे समन्वयक प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, सूत्रसंचालन प्रा.ज्योती जंगले तर प्रथम सत्राचे आभार प्रा. डॉ. एम.जे.जाधव, द्वितीय सत्राचे आभार प्रा.डॉ. विद्या पाटील यांनी मानले.