
साईमत प्रतिनिधी
सोन्यावर कर्ज घेण्याची प्रथा सर्वसामान्यांना माहीत आहे, मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत चांदीलाही कर्जासाठी पात्र धातूंच्या यादीत समाविष्ट केले आहे. म्हणजेच आता चांदीचे दागिने, नाणी किंवा भांडी गहाण ठेवूनही बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देतील.
‘RBI डायरेक्शन 2025’ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे नियम 1 एप्रिल 2026 पासून देशभर लागू होणार आहेत. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो लोकांना सोयीस्कर आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
कोण देऊ शकेल सोने–चांदीवर कर्ज?
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार खालील वित्तीय संस्थांना सोने आणि चांदीवर कर्ज देण्याची परवानगी मिळाली आहे —
-
व्यावसायिक बँका (लघु वित्त व प्रादेशिक ग्रामीण बँकांसह)
-
नागरी व ग्रामीण सहकारी बँका
-
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs)
-
गृहनिर्माण वित्त कंपन्या
कशावर मिळेल कर्ज — आणि कितीपर्यंत?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की केवळ दागिने आणि नाणी यांच्यावरच कर्ज मिळेल.
-
सोन्याचे दागिने – जास्तीत जास्त १ किलोपर्यंत
-
चांदीचे दागिने – जास्तीत जास्त १० किलोपर्यंत
-
सोन्याची नाणी – ५० ग्रॅमपर्यंत
-
चांदीची नाणी – ५०० ग्रॅमपर्यंत
या मर्यादेपेक्षा जास्त वजनावर कर्ज देण्यात येणार नाही.
किती टक्के कर्ज मिळेल?
कर्जाची रक्कम गहाण ठेवलेल्या धातूच्या मूल्यावर अवलंबून असेल. आरबीआयने कर्जाचे प्रमाण पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे :
-
₹2.5 लाखपर्यंत – 85% पर्यंत कर्ज
-
₹2.5 ते ₹5 लाख – 80% पर्यंत कर्ज
-
₹5 लाखांपेक्षा अधिक – 75% पर्यंत कर्ज
उदा. — जर तुमच्याकडे ₹1 लाख मूल्याची चांदी असेल, तर तुम्हाला ₹85,000 पर्यंत कर्ज मिळू शकते.
मूल्यांकन कसे होईल?
बँका किंवा एनबीएफसी संस्थांकडून गेल्या 30 दिवसांची सरासरी बंद किंमत किंवा आदल्या दिवसाची किंमत (ज्यातील कमी किंमत) घेतली जाईल. ही किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) किंवा मान्यताप्राप्त कमोडिटी एक्स्चेंजच्या दरावर आधारित असेल.
दागिन्यांतील रत्ने, दगड किंवा इतर धातूंचे मूल्य यात धरले जाणार नाही.
कर्ज प्रक्रिया आणि सुरक्षा
कर्ज घेणाऱ्याच्या उपस्थितीत दागिन्यांची तपासणी केली जाईल. बँक मूल्यांकनाचा प्रमाणित अहवाल देईल व सर्व माहिती स्थानिक भाषेत किंवा ग्राहकाच्या पसंतीच्या भाषेत दिली जाईल.
गहाण ठेवलेले सोने–चांदी बँकेच्या सुरक्षित तिजोरीत ठेवले जाईल आणि केवळ अधिकृत कर्मचारीच त्यास हाताळू शकतील.
कर्जफेड आणि परतावा नियम
कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर ७ कामकाजाच्या दिवसांत बँकेने तारण ठेवलेले दागिने किंवा चांदी परत द्यावीत.
बँकेच्या चुकीमुळे विलंब झाल्यास ग्राहकाला दररोज ₹5,000 दंडभरपाई द्यावी लागेल.
परतफेड न केल्यास काय?
-
ग्राहकाने वेळेवर परतफेड न केल्यास बँकेला दागिने किंवा चांदी लिलावात विक्रीची परवानगी असेल.
-
लिलावाची राखीव किंमत सध्याच्या बाजारभावाच्या किमान 90% असावी.
-
दोनदा लिलाव अयशस्वी झाल्यास किंमत 85% पर्यंत कमी करता येईल.
-
ग्राहक किंवा वारस दोन वर्षांपर्यंत दागिने परत घेत नसल्यास ते ‘दावा न केलेले तारण’ म्हणून जाहीर केले जाईल आणि संपर्क मोहीम राबवली जाईल.
ग्राहकांसाठी फायदेशीर संधी
आरबीआयचा हा निर्णय ग्रामीण व निम्नमध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आर्थिक मदतीचे नवे दार उघडतो. आतापर्यंत फक्त सोने गहाण ठेवून कर्ज घेता येत होते, परंतु आता चांदीच्या संपत्तीवरही कर्ज मिळणार असल्याने लाखो लोकांना लाभ होईल.
रिझर्व्ह बँकेच्या या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ‘मेटल बेस्ड कर्ज बाजारपेठे’चा विस्तार होणार असून, सोन्या-चांदीच्या मालकांसाठी ही एक मोठी आर्थिक सोय ठरेल.
विश्वसनीय बँकिंग प्रणालीतून सुरक्षित कर्ज मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


