साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नगरपालिकाचे मुख्याधिकारी (प्रशासक) निवडणूक कामासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळे नगरपालिकेच्या कार्यालयात दुपारी ‘सन्नाटा’ पसरल्याचे दिसून आले. अक्षरशः कार्यालयात कर्मचारी आपल्या खुर्च्यावरून गायब होते. कोणी खासगी कामाने बाहेर गेले आहे तर कोणी जेवण करून अद्याप आलेच नाही, असे तेथील कर्मचाऱ्यांनी बोलतांना सांगितले. मुख्याधिकारी कार्यालयात नसले तर कर्मचारी, अधिकारी पण गायब असतात. त्यांची संबंधित अधिकारी चौकशी करतील का? अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात नागरी सुविधांच्या समस्यांचे डोंगर उभे असतांना अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्यांची कामे वेळेवर करत नाही. चाळीसगाव नगरपालिका प्रभागात अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. वार्डात कचरा साचला आहे. बहुतांश वेळा रस्त्यावरील पोलवरचे स्ट्रीट लाईट दिवसा सुरु असतात. नगरपालिकेत सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. कार्यालयात गेल्यावर मुख्याधिकारी आहेत का? अशी विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांकडून साहेब सकाळपासून आलेच नाही. दुपारून येता का? येत नाही? माहित नाही? साहेबांचे कोणी साहेब आहेत का? अशी एक ना अनेक उत्तरे तेथील कर्मचारी देतात. सध्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना कुणाचाही धाक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.