आपल्याच पक्षाला जागा सुटणार असल्याचा करताहेत दावा
साईमत/जामनेर/पंढरीनाथ पाटील
जामनेर विधानसभा मतदारसंघातून ना. गिरीष महाजन यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी गेल्याच महिन्यात ना. महाजन यांच्या गोटातील माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांच्या हातात ‘तुतारी’ देऊन त्यांची उमेदवारीही जाहीर करुन टाकण्यात आली. त्यांचा प्रचारही मतदार संघात सुरू झाला आहे. त्यांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गोटातून सांगण्यात आले. अगोदरच मतदार संघाला परिचित चेहरा असल्यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचारात त्यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. खोडपे सरांसारखा मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या गळाला लावून ना.महाजन यांच्यापुढे तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, महाविकास आघाडीचे इतर सहकारी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांच्याकडून जामनेर विधानसभा मतदासंघात स्वतंत्र प्रचार सुरु असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच महाविकास आघाडीचे तिघेही घटक पक्ष तीन दिशेने प्रचार करतांना दिसून येत आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले यांचे स्वीय सहाय्यक मदन जाधव, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, माजी तालुकाध्यक्ष शरद पाटील तर उबाठा शिवसेनेकडून राज्य संघटक राहुल चव्हाण मैदानात उतरण्याची तयारी करतांना दिसून येत आहेत. मदन जाधव आणि शंकर राजपूत यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेत मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच जामनेरची जागा सुटणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत अाहे. त्यामुळे त्यांनी गाव, खेड्यापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी निवडक पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन जामनेर मतदार संघावर शिवसेनेचा दावा सांगितला आहे. स्वतःची उमेदवारीही जाहीर केली आहे. जर शिवसेनेला जागा सुटत असेल तर पक्ष देईल त्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार असल्याचे सांगून चव्हाण यांनी स्वतःची अपक्ष लढण्याची तयारी असल्याचेही जाहीर केले आहे.
पक्षाचे नेते अन् कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करतील का?
गेल्या सहा टर्ममध्ये एकास एक उमेदवार देऊन व विरोधकांनी एकत्र ताकद लावूनही ना.महाजन यांचा पराभव झाला नाही. शेवटी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्या विरोधात तीन टर्म टक्कर देणारे संजय दादा गरूड यांनी आपण यांचा पराभव करूच शकत नाही, हे हेरून ना. महाजन यांच्या गोटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सहज घेतला असेल का? आणि आता महाविकास आघाडीचे स्वयंम घोषित उमेदवार तीन दिशेने स्वतःचा प्रचार करुन ना. महाजन यांना आव्हान देण्यासाठी उभे ठाकले आहेत. त्यांची परिस्थिती आज अशी असेल तर महाविकास आघाडीकडून अधिकृत एकाच उमेदवाराची घोषणा झाल्यास हे तीन पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराचा एकदिलाने खरोखर प्रचार करतील का? हा आघाडीचा गहन प्रश्न मतदारांपुढे येऊ शकतो, यात शंका नाही. त्यामुळेच आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत? मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी काय निर्णय घेईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे, हेही तेवढेच खरे…!