बंगळुरु ः
भाजपाला पराभवाची धूळ चारत कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता १०० दिवस लोटले आहेत. “सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती. त्यापैकी तीन आश्वासने पूर्ण केली असून, चौथे आश्वासन बुधवारी (३० ऑगस्ट) पूर्ण करू”, असे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे.
सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात थोडी डळमळीत होती. बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले होते परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी या पदाचा हट्ट सोडला. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी बंगळुरू विकास (ज्याच्या अंतर्गत बृह्नबंगळुरू महापालिका येते) आणि जलसंधारण ही दोन खाती मिळवली. डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपासून लांब गेल्यामुळे सिद्धरामय्या यांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे दिसते.
सुरुवातीला अशाही अफवा होत्या की, सिद्धरामय्या यांचे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच अर्ध्यातच मुख्यमंत्रीपद काढून घेऊन, डी. के. शिवकुमार यांना संधी दिली जाईल. पण, या अफवांनाही सिद्धरामय्या यांनी खोटे ठरविले. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या नेमणुकांवर सिद्धरामय्या यांचाच वरचष्मा पाहायला मिळाला. एम. आर. सीताराम व उमाश्री या निकटवर्तीयांना सिद्धरामय्या यांनी विधान परिषदेवर घेतले.
