श्री संतसेना महाराज एक परखड संवादकर्ता

0
4

साईमत जळगाव प्रतिनिधी

आपणासी जे ठावे| ते इतरांस इतरांशी शिकवावे| शहाणे करुनी सोडवे| सगळंजन||1||

यानुसार समाजामध्ये आपल्या ज्ञानाने समाज प्रबोधनाचा वसा घेऊन वारकरी संप्रदायाची पताका ही उंचावर नेण्याचे काम संत मंडळींनी केले आहे.यात संत ज्ञानेश्वर ,संत नामदेव समकालीन संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज म्हणजेच, संत सेना न्हावी.

देविदास पंत यांचे कुटुंबीय हे मध्य प्रदेशातील बांधवगड मधील राजाला आपली सेवा देत असत आणि याच कुटुंबामध्ये देविदास पंत व प्रेमकुवरबाई यांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले. तो दिवस होता,वैशाख वद्य द्वादशी विक्रम संवत १३५७. देविदास पंत हे न्हाव्याचा व्यवसाय करायचे. परंतु त्यांना ईश्वर भक्तीची ओढ होती यातूनच श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील विठ्ठल पंत व देविदास हे दोन्ही श्री रामानंद स्वामी या गुरूंकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जात असत. म्हणजेच विठ्ठल पंत व देविदास हे दोन्ही गुरुबंधू होते .वडिलांनी शिकवलेला न्हाव्याच्या व्यवसायाचे धडे संत सेना यांनी घेतले. व्यवसाय तर केलाच, पण तो करत असताना अध्यात्माची अत्यंत आवड आणि परमेश्वराच्या चरणी निष्काम अशा प्रकारची भक्ती करण्याची मनापासून ओढ होती.वडिलांची पांडुरंगावर असणारी भक्ती ,पांडुरंगा विषयी असणाऱ्या भक्तीवर निष्ठा ,घरातील आध्यात्मिक वातावरण यामुळे संत सेना हे सुद्धा वातावरणाच्या प्रभावाने अध्यात्मिक विचारसरणीचे घडले हे जरी खरे असले तरी विचार परखड व तत्ववादी होते. साधू, संत यांचे संत सेना यांच्या घरी येणे जाणे होते .आलेल्या संत मंडळींचे स्वागत आदर सत्कार, सेवा करणे हे संस्कार वडील देविदास यांच्याकडून संत सेना न्हावी यांच्याकडे आले होते.
आजि सोनियाचा दिवस। दृष्टी देखिलें संतांस ॥१॥
जीवा सुख झालें। माझें माहेर भेटलें ॥२॥
अवघा निरसला शीण। देखता संतचरण ॥३॥
आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ॥४॥
आपल्या रचनेतून संत सेना महाराज यांच्या कुटुंबात दिले गेलेले संस्कार व यातून संत मंडळी यांची सेवा करण्याची वृत्ती ही संत सेना न्हावी यांच्या मनामनात आणि कृतीत भरलेली आपल्याला दिसते. संतांना जीवनात आदराचे स्थान देऊन, त्यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचे कष्ट नसून ,हे कार्य करत असताना आनंद व्यक्त झालेला या ठिकाणी दिसतोय. संत मंडळींची सेवा ही जणू ईश्वरसेवा असल्याची भावना या ठिकाणी प्रकटताना दिसते.
तसेच,नेहमी आपला व्यवसाय व पांडुरंगाचे चिंतन नामस्मरण हे नित्याचे काम म्हणून विचार नसून भगवत भक्ती ही नेत्याची सेवा करण्याची इच्छाशक्ती संत सेना न्हावी यांच्याकडे होती.
विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा ॥१॥
पायीं ठेउनियां माथा । अवघी वारली चिंता॥२॥
समाधान चित्ता। डोळा श्रीमुख पाहतां ॥३॥
बहू जन्मी केला लाग। सेना देखे पांडुरंग ॥४॥
पांडुरंग हाच माझी चिंता हरणारा, पालन पोषण करणारा आहे. याच्या चरणी राहिल्याने मनाला समाधान प्राप्त होते. आयुष्यभर फक्त आणि फक्त भगवत भक्ती हीच वृत्ती संत सेना यांनी जोपासली. जन्मोजन्मी अशाच प्रकारचे सेवा घडण्याचा मानस असावा असे संत सेना न्हावी यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून या ठिकाणी दिसून येते.
तसेच,संत सेना व्हावी यांच्या विद्वत्तेची व प्रगल्भ अशा ज्ञानाची प्रचिती चा संदर्भ आपल्याला आपल्याला संदर्भ ग्रंथात आढळतो. ज्यावेळी चित्तोडगढ येथील महाराणा सांगा यांची राणी काशी क्षेत्रात संत रोहिदास यांच्या अमृतवाणीने फार प्रभावित होतात. आणि गुरु आपल्या शिष्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करून जगण्याचा जो योग्य मार्ग दाखवितात त्या नुसार गुरु म्हणून संत रोहिदासांनी आपल्याला दीक्षा द्यावी हा अट्टाहास धरतात. संत रोहिदासांकडून दीक्षा घेतात.त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी संत कबीरांचा सहभाग असतो आणि ज्यावेळी वाद मिटत नाही. त्यावेळी संत कबीर संत रोहिदासांना बांधवगड येथून संत सेनाजी महाराज यांना आमंत्रित करण्यास सांगतात.
रैदास परचई मधील दोह्यात संत कबीर म्हणतात…
कहै कबीर न माने सीखा । जिनि खाई राजन की भीखा ॥
ब्रह्म सिखवै तौऊ न माने । हमहि तुमहि कमी करि जानें ॥
सालिगरामहिं सौपौं सेन नाई। जै तुम अपनौं पल्लौ छुडाऊ ।
औसी सीख कबीर पढाई । सो रैदास बहुत मन भाई ।|
संत रोहिदास यांनी संत कबीर यांच्यावर विश्वास ठेवून संत सेना यांना बोलावून घेतात. संत सेनाजी महाराज व विद्वान धर्मपंडितांसह शास्त्र चर्चेला सुरुवात करताना रोहित संत रोहिदास यांच्यावरील आरोप प्रत्यारोपांच्या माहितीचे वाचन करण्यात येते.
रैदास परचई मधील दोह्यात संत रोहिदास लिहतात…
कासी नगर सबै चलि आये। पहले परचे सबनि सुनाये ॥
निज हरी भगत सेन नाई। बांधौगड तै सो चलि आऊ ।
संत सेनाजी महाराज व विद्वान धर्म पंडितांसह ब्राह्मणांमध्ये शास्त्रार्थ चर्चेला सुरुवात झाली. विद्वान पंडितांनी उच्चवर्णीय जातीतील लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट मत मांडले.संत सेनाजी महाराज म्हणाले,
जात पाँत, छोट मोट को सोचणो । हे अति तुछ विचार ॥
सेन कहें फरक मानत नही । ईश्वर अपने दरबार ।
जात पात, लहान मोठा अर्थात माणसा माणसात कुणाला लहान तर कुणाला मोठा मानणे हा अत्यंत तुच्छ विचार आहे. माणसात कुठलाही फरक नाही. ईश्वराच्या दरबारात सर्व एक समान आहेत. भगवंत कुणातही भेदभाव करत नाही. सर्व मानव जातीला समभावाने न्याय देतो. विद्वान पंडित म्हणाला, सेना तुम्ही म्हणतात,ईश्वराच्या दरबारात सर्व एक समान आहेत. हे आम्हाला मान्य नाही कारण वर्णव्यवस्थेनूसार उच्च कुळातील ब्राह्मण आणि कनिष्ठ कुळातील शुद्रांची बरोबरी होऊच शकत नाही. अनेक दाखले संत सेना मांडू लागले,
बड़ो कहावे जगत में करे हीन को काम ॥
सेन कहें जग निंदा करे। मिटावे वंस को नाम ॥
बहुजन समाजातील लोकांना शुद्र मानून त्यांच्याशी दुजाभावकरण्याचे काम करतात,असे पाखंडी लोक जनतेच्या निंदेला कारणीभूत होतात आणि स्वतःचे नाव आणि वंश डुबविण्याचे काम करतात.असे परखड विचार मांडतात.याही पुढे जाऊन संत सेना म्हणतात,
चार दिनाकी जीनगी । कर लो सुथरा काम ॥
सेन कहें साँची कहू । जग सिमरेगा नाम ।।
माणसाचे जीवन चार दिवसाचे आहे. मनुष्य जन्मामध्ये व्यक्ती चांगल्या काम करून त्याच्या कर्माने मोठा होत असतो. कर्म हे महत्त्वाचे त्यावरून व्यक्तीचं व्यक्तित्व घडत असतं कर्माचा “कर्मवादी सिद्धांत आणि व्यक्ती “या दोघांमधील संबंध संत सेना देतात. अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांवरून सामाजिक समता व मानवतावादी विचारांना प्राधान्य देणारे संत सेना या ठिकाणी आपल्याला दिसतात. कुठलाही व्यक्ती उच्च किंवा कनिष्ठ हा त्याच्या जातीवर अवलंबून नसून व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर हे अवलंबून असते. हा विचार प्रकर्षानं या वरील प्रसंगात दाखले देत संत सेना मांडतात. या शास्त्रोक्त वादविवादानंतर संत रोहिदास यांची संघर्षातून मुक्तता होते आणि यावरून भक्तीच्या नामाबरोबरच एक उत्तम विद्वान संवादकर्ता म्हणून देखील एक ओळख संत सेना महाराज यांची आहे.
संत मंडळींमध्ये विचारांची गुंफण करताना देखील संत सेना महाराज यांच्या विचारांची छाप पडलेली आपल्याला दिसून येते.रैदास परचई मधील दोह्यात संत कबीर म्हणतात…
झगरौ सगरौ मिटि गयौ । सुमिरन लागै संत ||
सोई साँची मानिये । जो बोलै भगवंत ।।
सांझी बार सेन रैदास । चलि आये कबीर पास ॥
आदर करि कबीर बैसारे । समाचार सब सुनें तुम्हारे ।
करत परसपरि सतुति नाऊ । और भगत सब बंदे पाऊ ।।
अरध रात री सुमिरन जागे । तब बैरागी सेवा लागे ।
तिनही भगत जु बैठे जब ही । दीयौ चतुरभुज दरसन तब ही ॥
उठी रैदास परे जब चरणां । सेन से कहें हूँ तुम्हरे सरनां ॥
अशा प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या भक्ताला, विद्वान परखड संवाद कर्त्याच्या चरणी माझे लेखन समर्पित.

– डॉनरेंद्र दिनकर महाले
सरस्वती विद्या मंदिर, यावल .9271222695

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here