साईमत जळगाव प्रतिनिधी
वंचित व गरिबांची मदत हिच ईश्वराची पुजा असे मानून सुधर्मा संस्थेद्वारे शहरातील महाबळ परिसरातील देवेंद्र नगरातील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील राम मुर्ती प्रतिष्ठापणेच्या दिवशी सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, सुनिता बेलसरे यांचे हस्ते श्रीरामाचे पुजन व हवन करण्यात आले. यावेळी कचरावेचक महिलांना किराणा वाटप करत दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.
यावेळी हेमंत बेलसरे यांनी राममंदिराच्या उभारणी बद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले व सर्वांना रामराज्याची संकल्पना समजावून सांगत त्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी आपणास शबरीची व वाल्मिकी ची गोष्ट नेहमीच प्रेरणा देते असेही त्यांनी सांगितले. प्रसंगी राममंदिराचे व्यवस्थापक जेष्ठ नागरिक शंकरराव कामठे, धर्मराज पाटील, महेंद्रसिगं राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तांबापुरा, भिलपूरा, मेहरूण, वाघनगर परिसरात राहणाऱ्या २२ गरजू कचरावेचक महिलांना सुधर्मा च्या वतीने किराणा वाटप करण्यात आला. तसेच त्यांना मिठाई, श्रीरामा ची तसबीर व पितळी नंदादीप देण्यात आला. याचवेळी साक्षी राजेश कोष्टी इयत्ता १०वी (नशिराबाद ) व रोशनी चंद्रकांत येरुळकर इयत्ता ९ वी (मेहरूण) या २ विद्यार्थिनींना २ लेडिज सायकली देण्यात आल्या. त्यामुळे या मुलींची पायपीट थांबणार आहे. यावेळी आपल्याला खुप आनंद झाला, कारण आमच्या पालकांची सायकल घेऊन देण्या सारखी परिस्थिती नाही असे या मुलींनी सांगितले. सुधर्माची ही सामाजिक पुजा बघून उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. यावेळी सुधर्माचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन तायडे व राहुल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.