कुसुंबाचा ‘उद्योजक’ सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
“केवळ एका दिवसात लाखोंचा नफा!” अशा आमिषाला बळी पडून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका उद्योजकाला तब्बल २ कोटी ५५ लाख रुपयांचा ऑनलाईन चुना लावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. व्हॉट्सॲपवरून सुरू झालेला विश्वासाचा खेळ अखेर करोडोंच्या फसवणुकीत परावर्तीत झाला. दरम्यान, जिल्ह्यातील सायबर फसवणुकीचा आतापर्यंतचा हा प्रकार सर्वात मोठा मानला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (वय ४२, रा. तारा बिझनेस पार्क) यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ‘आरयूएसएल-सीसीएम’ या कथित शेअर कंपनीच्या नावाखाली ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क झाला. सुरुवातीला १ लाखाच्या गुंतवणुकीवर ४९ हजार ५०० रुपयांचा नफा दाखवून तो परत देण्यात आला. त्यानंतर विश्वास बसल्याने लोखंडवाला यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली.
“एका क्लिकमध्ये गमावले अडीच कोटी!”
विविध मोबाईल ॲप आणि लिंकद्वारे ॲक्सिस, बंधन आणि आयसीआयसीआय बँकांमार्फत २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान १३ हप्त्यांत २ कोटी ५५ लाख रुपये जमा केले गेले. ॲपमध्ये नेहमीच नफा दाखवला जात होता. अगदी १५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे स्क्रीनवर दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष पैसे काढण्यासाठी आणखी कोटींची मागणी होताच फसवणूक उघड झाली. त्यामुळे उद्योजकाने “एका क्लिकमध्ये अडीच कोटी!” गमावल्याचा सूर उद्योग क्षेत्रातून आता उमटू लागला आहे.
सायबर पोलिसांकडून नागरिकांना सावधानतेचे आवाहन
याप्रकरणी सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. “नागरिकांनी लोभाला बळी न पडता कोणत्याही प्रकारची ऑनलाईन गुंतवणूक करण्याआधी ती अधिकृत आणि प्रमाणित आहे का…? हे तपासून पाहावे,” असे आवाहन जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे यांनी केले आहे.