आशिर्वाद देतो’ म्हणत साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक लुटमार
साईमत/ भडगाव/प्रतिनिधी
भडगाव परिसरात साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आशिर्वाद देण्याच्या बहाण्याने स्थानिक दाम्पत्याकडील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, तपास सुरू आहे.
घटनेनुसार, वडगाव मुळाचे राजेंद्र भिकनसिंग पाटील व त्यांची पत्नी सुरेखा पाटील मोटारसायकलने आपल्या गावाकडे जात असताना भडगावच्या कोठली फाट्याजवळ साधूवेशातील दोन इसमांनी त्यांना थांबवले. पांढऱ्या रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून आलेल्या या इसमांनी नाशिककडे जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला.
यानंतर दोघांनी “आशिर्वाद देतो” असे सांगितले आणि दाम्पत्याला १०० रुपये देऊन त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या मागितल्या. क्षणिक गोंधळात आलेल्या वयस्कर दाम्पत्याने अंगठ्या देऊन दिल्या. त्यानंतर साधूवेशातील इसमांनी “मोटारसायकल साईडला लावा, आशिर्वाद देतो” असे सांगून दाम्पत्याला थांबवले आणि पुढे स्वतः स्विफ्ट कार घेऊन पळ काढला.
भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साधूवेशाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांनी अपरिचित व्यक्तींकडून आशिर्वाद, भेटवस्तू किंवा पैशांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाने विशेष सांगितले आहे.
