परभणी ः
परभणीचे शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय जाधव यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. निधीबाबत तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाही. पैसे दिल्यावरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप संजय जाधव यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय जाधव पुढे म्हणाले की, “परभणी जिल्ह्याच्या निधीबाबत पालकमंत्री तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाहीत. गेल्यावर्षीचा एक दमडीही निधी मिळाला नाही. कररुपातून उभा राहिलेला तो निधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने निधीचे मालक पालकमंत्री झाले आहेत.ते कोणालाच मोजायला तयार नाहीत.पैसे दिले, तरच निधी दिला जातो, अशी परिस्थिती जिल्ह्यात सुरु आहे.
“जे शिंदे गटात गेले तर निधी मिळतो. त्यांच्याकडे न जाणाऱ्यांना निधी दिला जात नाही. ज्या पक्षाने आमची जडणघडण केली, त्याच्याशी प्रामाणिक राहणे ही आमची संस्कृती आहे. विरोधी पक्षात असताना १० वर्षे आमदार म्हणून काम केले पण, यापूर्वी कधीही अशाप्रकारचा त्रास झाला नाही,अशी खंत संजय जाधव यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंनी वेळकाढूपणा केला
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नटराज रंगमंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. उद्धव ठाकरे यांनी निधी देण्याचे कबुल केले पण, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना वेळकाढूपणा करण्याचे काम केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना निधीबाबत पत्र लिहिले पण अद्यापही निधी मिळाला नाही.पर्यटन विभागाने ३० कोटींचा निधी दिला होता. त्यालाही स्थगिती लावली आहे,असेही संजय जाधव यांनी सांगितले.