साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी
राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जिल्हा दौर्यावर आले आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचे पाचोरा नगरीत आगमन झाले असता शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी यांचे औक्षण करत पाचोरा नगरीत स्वागत केले.
अजितदादा पवार यांचा आज जळगाव जिल्हा दौरा आहे. यावेळी सुरूवातीला त्यांनी चाळीसगाव शहरात कार्यकर्त्यांशी भेट घेवून संवाद साधला त्यानंतर थेट पाचोरा शहरात सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. शहरात दाखल होण्यापुर्वी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी अजितदादाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या ठिकाणी विविध संघटनांनी विविध समस्या बाबत ना. अजित पवार यांना निवेदने दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या समवेत अजित पवार हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. प्रसंगी ना.अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत त्यांना निर्मल सिडस् कंपनीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात माजी आमदार आर. ओ. तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणा संदर्भातही माहिती देण्यात आली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी अजित पवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.