स्थानिक स्वराज्य संस्थांत तुल्यबळ उमेदवार देणार – शिवसेना संपर्कप्रमुख सावंत

0
63

जळगाव ः प्रतिनिधी

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी तालुका दौऱ्यांवर भर दिला आहे. शिवसैनिकांशी थेट संवाद साधत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाकडे सर्वकाही संपले आहे, त्यामुळे आता तिकडे पत्रावळी उचलायला कोणी कशाला जाईल असा दावा केला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार देणार असल्याचे सावंत यांनी सांगीतले.

शिवसेना पक्षाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन गटात विभागणी झाली आहे. मोठ्या प्रमाणात आमदार व खासदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. दरम्यान आमदारांचे समर्थकांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यास सुरुवात केली. जळगाव ग्रामीण मतदार संघात धरणगाव व जळगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात आले. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाचोरा, भडगाव तालुक्यात बैठका घेतल्या.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर सक्षम उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. धरणगाव पालिकेत 23 उमेदवार व नगराध्यक्षपदाचा उमेदवारदेखील तयार आहे. आता आरक्षण काय निघते यावर सर्वकाही अवलंबून असल्याचे संपर्कप्रमुख सावंत यांनी सांगितले.
शिंदेंसोबत गेलेल्यांना 50 खोके मिळाले. आम्ही देऊ शकत नाही. आमदारांनी आता राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. पक्षातून जाणारी सर्व लोक गेली आहेत. त्या ठिकाणचे सर्व काही संपले आहे. त्यामुळे आता नव्याने कोणी कशाला पत्रावळी उचलायला जाईल अशा शब्दात पक्षातून होणारी गच्छंती थांबल्याचा दावा सावंत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here