साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवभोजन केंद्रात भोजन देताना अस्वच्छता असणे, सीसीटीव्ही नसणे, अन्न शिजविण्यासाठी किचनची व्यवस्था नसणे, लाभार्थ्यांशी अरेरावी आदी कारणांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी शिवभोजन चालकांना कारणे दाखवासह केंद्र का रद्द करू नये अशा आशयाच्या नोटीस दिल्या आहेत.
मेहरूण परिसर, जिल्हा रुग्णालय, रेल्वे मालधक्का, गोलाणी मार्केटसह विविध ठिकाणी असलेल्या शिवभोजन केंद्रांत अन्न शिजविण्यासाठी किचन नसणे, केंद्रात अस्वच्छता असणे, लाभार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नसणे आदी तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानूसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पथकांची नियुक्ती करून केंद्र तपासणीचे आदेश दिले. त्यात अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. यामुळे संबंधित तीस केंद्र चालकांना १७ ते १९ आक्टोबरदरम्यान उत्तर देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे शिवभोजन चालकांना प्रत्यक्ष बोलाविण्यात आले आहे.