
साईमत प्रतिनिधी
परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी आणि रक्षा विसर्जन करण्याऐवजी भडगाव तालुक्यातील शिंदे परिवाराने फळझाडे लावून स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांची स्मृती जपली, आणि समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श ठेवला.
भाजपाचे कार्यकर्ते भगवान शिंदे यांचे बंधू व सागर शिंदे यांचे वडील स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सागर शिंदे, त्यांची पत्नी सोनल, भगिनी सोनाली जितेंद्र पाटील, मोनाली किरण पाटील, रूपाली कुणेश बोरसे तसेच संपूर्ण शिंदे परिवाराने ठरविले की अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जित न करता, त्यांच्या स्मृती म्हणून फळझाडे लावावीत.
“अस्थी विसर्जनाने नदी प्रदूषित होते, त्यामुळे त्याऐवजी वृक्षारोपणाचा मार्ग निवडला,” असे शिंदे कुटुंबियांनी सांगितले. स्वर्गीय नारायण शिंदे हे स्वतः निसर्गप्रेमी आणि वृक्षसंवर्धन करणारे होते. त्यांच्या या विचारांचे जतन करण्यासाठी कुटुंबियांनी ‘स्मृतीचे वृक्ष’ लावून त्यांची आठवण जिवंत ठेवली.
या उपक्रमाला पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) व टीम हिरवांकुर चे नाना पाटील सर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांनी शिंदे परिवारास सांगितले की पारंपारिक पद्धतीने अस्थी विसर्जन केल्यास नदी प्रदूषण वाढते आणि जलचर पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे अशा पर्यायी उपक्रमांद्वारेच खरे पर्यावरण रक्षण साध्य होऊ शकते.
या वेळी जावई जितेंद्र पाटील (शिरपूर) यांनी सांगितले की, “प्रत्येकाने आपल्या प्रियजनांच्या स्मृतीत एक झाड लावले, तर ती स्मृती फुलांच्या रूपात कायम राहील आणि निसर्गालाही दिलासा मिळेल. समाजाने ही पद्धत स्वीकारावी, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
कार्यक्रमावेळी माजी सैनिक उत्तमराव भिका पाटील (तांदुळवाडी) व आनंदा पाटील (सामनेरकर) उपस्थित होते. त्यांनी अशा उपक्रमांचे गावागावात आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.
नाना पाटील सर यांनी या अभिनव प्रयोगाचे कौतुक करत म्हटले, “शिंदे परिवाराने फक्त आपल्या प्रियजनांची स्मृती जपली नाही, तर जलप्रदूषण रोखून समाजालाही नवा संदेश दिला आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणप्रेमाची नवी संस्कृती निर्माण होईल.”


