शरद पवार-राहुल गांधींमध्ये खलबते

0
25

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंडिया आघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये जागावाटपावरून नेत्यांनी एकमेकांना निर्वाणीचा इशारा दिल्यामुळेही राहुल गांधी व शरद पवार यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’तील खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे महाआघाडीतील नेत्यांचे संयुक्त आंदोलन झाल्यानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीमधून रवाना झाले. जंतर-मंतरवरून दोन्ही नेते थेट पवारांचे ‘६ जनपथ’ या निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या मध्ये राज्यातील जागा वाटपाच्या मुद्द्याचा समावेश असल्याचे समजते. काँग्रेसच्या दृष्टीने महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब व बिहार आदी राज्यांमध्ये जागावाटपाचा मुद्दा गंभीर बनू लागला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून तीसहून अधिक जागांबाबत सहमती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसच्या जागांसदर्भात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. पवार व राहुल गांधी यांच्यातील सल्लामसलतीमुळे राज्यातील महाविकास आघाडीतील चर्चेलाही गती मिळाल्याचे सांगितले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here