आत्मविश्वास, सकारात्मक विचार, लक्ष्यनिर्धारणाचा तरुणांना दिला प्रेरणादायी संदेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
ढाके कॉलनीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रात आयोजित प्रेरणादायी युवक कार्यक्रमात माउंट आबू येथील राजयोग प्रशिक्षक तथा मोटिवेशनल स्पीकर राजयोगी ब्रह्माकुमार रूपेशभाई यांनी उपस्थित तरुणांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार व लक्ष्यनिर्धारणाचा सामर्थ्यशाली संदेश दिला. कार्यक्रमाचा प्रमुख विषय “आपले भविष्य स्वतः घडवा.” होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तरुणांना विचारलेल्या प्रश्नाने सभागृहात चिंतनाचे वातावरण निर्माण झाले. प्रेरणादायी उदाहरणे मांडत त्यांनी सांगितले की, धीरुभाई अंबानी यांनी कारकीर्दीची सुरुवात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यापासून केली आणि नंतर भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे संस्थापक झाले. रजनीकांत, आजचे सुपरस्टार, सुरुवातीला बस कंडक्टर होते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साध्या कुटुंबातून आले. पण कष्ट, शिस्त आणि विज्ञानावरील निष्ठेमुळे ते भारताचे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. ही सर्व उदाहरणे हे सिद्ध करतात की, यश जन्मतः मिळत नाही, ते प्रयत्न, धैर्य आणि संकल्पातून निर्माण होते. भाग्य तयार केले जाते, ते तयार मिळत नाही.
वक्त्यांनी सांगितले की, मनुष्य आपल्या विचारांनीच आपले भविष्य घडवतो. एका संशोधनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ८० टक्के विचार व्यर्थ, १५ टक्के भविष्याची चिंता, आणि फक्त ५ टक्के विचार वर्तमानाचे असतात. भगवद्गीतेतील श्रीकृष्णांचा अर्जुनाला दिलेला उपदेश नमूद करत त्यांनी सांगितले की, “भूतकाळाचे दुःख आणि भविष्याची चिंता सोडा-वर्तमानात कर्म कर.”
नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी त्यांनी SOS फॉर्म्युला सांगितला. तो असा की, S-Stop (थांबा), O-Observe (निरीक्षण करा) S-Switch (विचार बदला). विचार बदला-जीवन बदलेल. लक्ष्य ठरवा-ऊर्जा योग्य दिशेला वापरा तरुणांना संदेश देताना ते म्हणाले की, “ज्याच्या जीवनात मोठे लक्ष्य नाही, त्याचे वर्तमानही कमकुवत असते.” लहान व मोठे दोन्ही प्रकारचे लक्ष्य निश्चित करणे आवश्यक आहे. मनुष्य आपल्या क्षमतेतील फक्त ५-१० टक्के ऊर्जा वापरतो, उर्वरित ऊर्जा योग्य दिशेला वळवली तर जीवनात अशक्यही शक्य होते. अखेरीस त्यांनी तरुणांना प्रेरणा दिली. “भाग्य कोणी देत नाही, ते स्वतः निर्माण करावे लागते.”
राजयोग ध्यानाचा संदेश
कार्यक्रमाच्या समारोपात ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदीजींनी तरुणांना नियमित राजयोग ध्यानाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले, जेणेकरून मानसिक शांती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढू शकेल. कार्यक्रमात चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी धीरज याचा विशेष सत्कार बी.के. रूपेशभाई यांच्या हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन बी.के. अस्मिता यांनी तर आभार बी.के. कोमल यांनी मानले.
