तृतीय क्रमांकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वंदे मातरम्’ समूह गीतगायन स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पारितोषिकात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम यांचा समावेश होता. स्पर्धेत शहरातील १८ शाळांनी सहभाग नोंदविला होता. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहाने एकसुरात, एकाच लयीत आणि उत्कृष्ट तालबद्धतेने संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेचे संगीत दिग्दर्शन वरुण नेवे यांनी केले तर वाद्य साथसंगत दर्शन गुजराती यांनी करून सादरीकरण अधिक प्रभावी केले. कार्यक्रमाला आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख रुपाली पाटील, स्वप्निल पाटील तसेच संपूर्ण शाळेने कौतुक केले आहे.
