साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सर्व शाळांचा होणारा रंगतरंग हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला. त्याच्या अंतर्गत या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शककर्ते शिवराय या महानाट्याचा तिसरा भाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर व स्वराज्य उभारणीवर आधारित ‘ शिवरायांचा गनिमी ‘ हा कलाविष्कार काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलतर्फे दि. ११ जानेवारी रोजी सादर करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी, प्रकल्प प्रमुख पुंडलिक पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे माजी विद्यार्थी अद्वय राजहस होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, प्रतिष्ठानचे सचिव व पलोड शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे, कोषाध्यक्ष पल्लवी मयूर, व्यवस्थापकीय सदस्य धनंजय जकातदार, सुधा शांती केंद्राचे प्रकल्प प्रमुख संजय बिर्ला, परीक्षक म्हणून लाभलेल्या वैदेही नाखरे, पलोड स्कूलचे मुख्याध्यापक प्रविण सोनावणे, प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, शाळेच्या समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
जगातील विविध विद्यापीठात ज्या युद्धनीतींचा अभ्यास केला जातो त्यातीलच एक युद्धनीती म्हणजे गनिमी कावा आणि जिथे जनक आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहणारे श्री. छत्रपती शिवाजी महाराज याच युद्धनीती चा युद्धात उपयोग करून शिवाजी महाराजांनी शत्रूला पळता भुई थोडी करत स्वराज्याची उभारणी केली . त्यातीलच काही प्रसंग नाट्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करून गनिमी काव्याची ओळख करून दिली. काही प्रसंग आहेत तोरणा किल्ला, अफजलखानाचा वध , पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची पहिली लूट, आग्र्याहून सुटका, आरमार उभारणी , कोंढाणा किल्ला तसेच शिवाजी महाराजांच्या स्तुती गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर केले. त्यातीलच काही गीते आहेत भवानी अष्टक’., आम्ही गड्या डोंगरचे, श्वासात राजं ध्यासात राज, इंद्र जिमी जिम्बपर ,परब्रम्ह , शिवबा माझा मल्हारी, लाखो झेंडे, मावळ जाग, हे शक्ती पीठ नाईके यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी बाविस्कर तर पाहुण्यांचा परिचय चित्रा पाटील यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .