शाहिरी व विविध लोककलांनी रंगला महाराष्ट्राची लोकधारा

0
14

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेमध्ये आपल्या शाहिरीने नवचैतन्य निर्माण करणारे पद्मश्री शाहीर कृष्णाराव साबळे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे जळगावच्या मूलजी जेठा महाविद्यालय व कान्ह ललीत कला केद्र यांच्या सहकार्याने क्रांती दिनानिमित्त पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त शाहिरी पोवाडा व शाहीर साबळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या शाहिरी परिसंवादाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे तर प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक राजेश कांबळे आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कान्ह ललीत कला केन्द्राचे समन्वयक शशीकांत वडोदकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर शिवाजीराव पाटील, शंभू पाटील, प्राचार्य डॉ. संजय भारंबे, शशीकांत वडोदकर आदींनी पद्मश्री शाहीर साबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी शंभू पाटील यांना पद्मश्री विखे पाटील स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल मु.जे. कॉलेज व खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या लोककला आणि लोक संस्कृतीचा जागर करणारा महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर विनोद ढगे व सहकारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या शाहीरी पोवाड्याने केला. आपल्या दर्जेदार शाहिरी पोवाडा व लोकगितातून शाहीर साबळे यांच्या स्मृतींना मानवंदना अर्पण केली.त्यानंतर शाहीर शिवाजीराव पाटील यांनी ऐतिहासिक सामाजिक पोवाडा यातून स्फूर्तीदायक विषयांवर प्रकाश टाकला व शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थित रसिकांना व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परिसंवादात लोककलेचे अभ्यासक तथा प्रतिषठान महाविद्यालय पैठण येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हंसराज जाधव, मु. जे. महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील व प्रा.डॉ. योगेश महाले यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची ओळख कलारसिक व विद्यार्थ्यांना करून दिली.

गण बतावणी, शाहीरी पोवाडा लोकगिते मुक्त नाट्य या विविध लोककलानी रगंलेला व शाहीर शिवाजीराव पाटील व शाहीर विनोद ढगेंसह पंचवीस कलावंताच्या संचात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी केली.आभार प्रदर्शन व सुत्रसंचलन प्रा. डॉ.योगेश महाले यांनी केले.या आयोजनात महाविद्यालयाचे संगीत विभागाचे प्रा.कपिन शिगणे, प्रा.देवेंद्र गुरव,नाट्यविभागाचे वैभव मावळे, नृत्य विभागाचे प्रा.अजय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबुराव मोरे, शाहीर सुरज राऊळ, जितेंद्र भांडारकर,भूषण पवार,यश चव्हाण,दुर्गेश आंबेकर, सचिन महाजन, अवधूत दलाल, अरविंद पाटील, सुदर्शन पाटील,मोहीत पाटील यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here