साईमत, जामनेर : प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळ शहरातील काही बुरसटलेल्या विचारांच्या समाजकंटकांनी शाई फेकून विटंबना केली. यामुळे समस्त दलित, वंचित, बहुजन, फुले, शाहु, आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याने असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने अशा समाजकंटकांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा द्यावी. समाजकंटकांना लवकर अटक न झाल्यास लोकांचा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक एकोपा आणि वातावरण बिघडू न देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी समाजकंटकांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अशा कृत्याचा नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या दालनात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी त्यांना निषेध व्यक्त करुन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पवन माळी, दीपक माळी, अविनाश बोरसे, किशोर तायडे, प्रवीण महाजन, अक्षय सोनवणे, सागर पाटील, सिद्धार्थ वाघ, सुधाकर सपकाळे, जितेंद्र माळी यांच्यासह सर्व समाजबांधव, दलित, वंचित सर्वच घटकांचे कार्यकर्ते उपस्थित होते.