गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह १९ वर्षीय तरुण जेरबंद
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी : –
शहरात एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करून संभाव्य अनर्थ टाळला आहे. मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे १७ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी, १७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी नियमित गस्तीवर असताना त्यांना एका संशयास्पद तरुणाबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा भुसावळ शहरातील हसन अली नियाज अली यांच्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करत दबा धरून बसला होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मजहर इराणी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे घातक शस्त्र आढळून आले. गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस सापडताच पोलिसांनी त्याला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीकडे शस्त्र बाळगण्यामागील नेमका उद्देश काय होता, तसेच हे शस्त्र त्याला कुठून आणि कसे मिळाले, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शहरात घडू शकणारा संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे व तत्पर कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याआधीच आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करत असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
