Send SMS Sent To Customers : वीज महावितरणतर्फे ग्राहकांना पाठवले जाणारे एसएमएस मराठीतच पाठवा

0
5

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना मनसेतर्फे दिले निवेदन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

वीज महावितरण विभागातर्फे ग्राहकांना वेळोवेळी वीजबिल भरण्याची तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, देखभाल-दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा आदी प्रकारचे एसएमएस मोबाईलवर पाठविले जातात. मात्र, हे सर्व एसएमएस इंग्रजी भाषेत असतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक आहेत. त्यांना इंग्रजी भाषेतील एसएमएस (संदेश) समजणे कठीण जाते. परिणामी अनेकवेळा ग्राहकांना योग्यवेळी महत्त्वाची माहिती मिळत नाही. त्यामुळे गैरसमज, त्रास व मानसिक तणाव निर्माण होतो. यासाठी वीज महावितरणतर्फे ग्राहकांना पाठविले जाणारे एसएमएस मराठीतच पाठविण्यात यावे, अशा आशयाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी असावी. शासनाचे मराठी भाषा संवर्धन व वापर वाढीसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आहेत. त्यानुसार महावितरणसारख्या सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या खात्याने आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महावितरण विभागामार्फत ग्राहकांना मोबाईलवर पाठविले जाणारे सर्व प्रकारचे एसएमएस मराठी भाषेत पाठविले जावेत. ह्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संदेश समजणे सोपे जाईल. विभागावरचा विश्वास अधिक दृढ होईल. ही मागणी अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनात नमूद केली आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, ॲड.सागर शिंपी, दीपक राठोड, प्रदीप पाटील, राजेंद्र बाविस्कर, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील, विकास पाथरे, किशोर खलसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here