मुंबई : प्रतिनिधी
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.
राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण राज्यपाल कोश्यारी सतत महाराष्ट्राचा अपमान करत असतात. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.