‘Self-Commitment’ : व्यसनमुक्त जीवनासाठी ‘सेल्फ कमिटमेंट’ सर्वात मोठं औषध ठरेल : अनिकेत आमटे

0
5

चेतना व्यसनमुक्ती केंद्राला हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत, समीक्षा आमटे यांची सदिच्छा भेट ; रुग्णमित्रांशी साधला संवाद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

आपण जेव्हा स्वतःशी ‘सेल्फ कमिटमेंट’ करतो, तेव्हाच खरा बदल आपल्या जीवनात घडतो. आपण सर्वांनी ठरवू या की, यंदाच्या दिवाळीत आपल्या परिवाराला व्यसनमुक्त जीवनाची सर्वात सुंदर भेट द्यायची आहे. सर्व रुग्णमित्रांनी स्वतःशी वचनबद्ध राहून परिवारात आनंद निर्माण करण्यासह समाजात परिवर्तन घडवावे, असे आवाहन करुन व्यसनमुक्त जीवनासाठी ‘सेल्फ कमिटमेंट’ सर्वात मोठे औषध ठरेल, असे प्रभावी प्रतिपादन हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे आवाहन केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे आणि समीक्षा आमटे यांनी बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी जळगाव दौऱ्यादरम्यान चेतना व्यसनमुक्ती केंद्राला सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील रुग्णमित्रांशी मनमोकळा संवाद साधत व्यसनमुक्त जीवनाबाबत प्रेरणादायी विचार मांडले.

सुरुवातीला ‘आज आनंदी आनंद झाला’ या गीतावर गुलाबाच्या पाकळ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि केंद्राच्या परिसरात आनंदमय, प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. भेटीत समीक्षा आमटे यांनीही रुग्णमित्रांशी संवाद साधत तरुणांसह विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही चिंताजनक बाब आहे. शिक्षण आणि जागृतीद्वारे आपण हे चित्र नक्कीच बदलू शकतो. त्या हेमलकसा येथील शैक्षणिक संस्थांच्या प्रकल्पप्रमुख आहे. त्या म्हणाल्या की, आज आदिवासी भागातील विद्यार्थी डॉक्टर होत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत आहेत, हे शिक्षण आणि आत्मविश्वासाचे फळ आहे. भेटीत अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांनी चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यप्रणाली, उपचार पद्धती आणि ‘ब्रेन प्रोग्रामिंग’ तसेच ‘हिप्नोथेरपी’ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

रुग्णांच्या जीवनात नव्या आयुष्याची सुरुवात

चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते आणि चेतना विसपुते यांनी केंद्रातील दिनचर्या, उपचार पद्धती आणि रुग्णांमध्ये घडणारे सकारात्मक बदल यांचे प्रभावी सादरीकरण केले. केंद्रातील दाखल रुग्णमित्रांपैकी पाच-सहा जणांनी आपले अनुभव शेअर करत म्हणाले की, “आमच्या जीवनात खरोखर बदल घडला आहे. आम्ही आता नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.” कार्यक्रमाला डॉ. सतीश, डॉ. समीर शिंदाडकर, प्रशांत विसपुते, डॉ. किरण सोनवणे, प्रतीक सोनार, जितेंद्र पाटील, तुषार ठाकूर, किरण बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते . शेवटी आभार निलेश काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here