युवा उद्योजक निर्मल नेमाडे यांच्या स्टार्टअपची निवड

0
21

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील युवा उद्योजक निर्मल नेमाडे यांची मुबंई येथे पार पडलेल्या सेमिनारमध्ये त्यांच्या स्टार्टअपची निवड केली आहे. यामुळे कळमसरे गावात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उपक्रमात जवळपास १० हजाराहुन अधिक रजिष्ट्रेशन झाले होते. मात्र, वेळोवेळी झालेल्या मुलाखतीत अवघ्या ६० स्टार्टअपची निवड करण्यात आली. त्यात निवड झालेले कळमसरेचे निर्मल नेमाडे यांच्या उपक्रमाचाही समावेश आहे.

अमळनेर तालुक्यातील मूळचे नांदेड येथील रहिवासी परंतु वैद्यकीय व्यवसायानिमित्त कळमसरे येथे स्थायिक असलेले डॉ.सुधाकर नेमाडे व डॉ.विजया नेमाडे यांचे लहान सुपुत्र युवा उद्योजक निर्मल सुधाकर नेमाडे यांच्या स्टार्टअपची कॉर्नल विद्यापीठ, न्यूयॉर्क आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी असणाऱ्या कॉर्नलमहा ६० या उपक्रमात निवड झाली आहे.

स्टार्टअप निवडीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार

“घन कचरा व्यवस्थापन व कृषी व्यवसाय” संकल्पनेवर आधारित त्यांच्या स्टार्टअप आयडियाला प्रशिक्षणासाठी पॅनलकडून पसंती मिळाली आहे. पुढे कॉर्नल विद्यापीठाकडून त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचा उपयोग म्हणून शासनाच्या काही योजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. साहजिकच त्यांचा संकल्पनेवर आधारित स्टार्टअप निवडीमुळे याचा निश्चितच राज्याला व राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कमी वयात कामाचा उमटविला ठसा

पुणे विद्यापीठातून निर्मल नेमाडे यांनी ‘व्यवसाय व्यवस्थापनाची’ पदवी घेतली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हणजेच कळमसरे गावी झाले आहे. कमी वयात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सेंद्रिय शेती व पर्यावरण संबंधित उपक्रमामध्ये त्यांना आवड आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेले “जिविका” कंपनीचे रासायनिक कीटकनाशके व खत द्रव्ये चांगलेच नावारूपाला आले आहेत. त्यांच्या स्टार्टअप निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here