आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी पहुरच्या अर्णव जोशीची निवड

0
29

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

गोवा (पणजी) येथे नुकतीच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात जामनेरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कुलच्या विविध वयोगटातील स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करुन दुहेरी यश संपादन केले आहे. तसेच श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी मजल मारली आहे. त्यात पहूरच्या अर्णव जोशीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये भुसावळ येथे जिल्हा व राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांची निवड झाली होती. २८ रोजी रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रिले स्केटिंग चषक गोवा यांच्यावतीने मिनिस्टरी ऑफ युथ ॲफीएरस ॲण्ड स्पोर्ट्स मिरामर, पणजी गोवा येथे राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.

उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (कंसात पदक आणि वयोगट) युगल सोनार (सुवर्ण, ब्राँझ १३-१४) पहिला, अर्णव मनोज जोशी तिसरा (सिल्व्हर, ब्राँझ), अथर्व पाटील पहिला (सुवर्ण, ब्राँझ ८-१०) व पार्थ पाटील दुसरा (सिल्व्हर, ब्राँझ), सार्थक पाटील पहिला (सुवर्ण, सिल्व्हर १०-१२) तसेच लोकेश चौधरी दुसरा (सिल्व्हर, ब्राँझ ९-१०) पदकांची कमाई करून उल्लेखनीय कामगिरी करत मराठी झेंडा रोवला आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आनंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या मे महिन्यात श्रीलंका येथे स्पर्धा होणार असल्याचे शिक्षक आनंद मोरे यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थ्यांमधील अर्णव जोशी हा पहूर येथील रहिवासी तथा पत्रकार मनोज जोशी यांचा चिरंजीव तर सीए विनोद जोशी यांचा पुतण्या आहे. अर्णवच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जामनेर व पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमंत ललवाणी, उपाध्यक्ष पिंटू कोठारी, सचिव अभय बोहरा, सहसचिव दीपक पाटील, व्यवस्थापक राहुल साबद्रा, मुख्याध्यापक विजय मोरे आदींनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here