नऊ खेळाडूंनी पाच गोल्ड, तीन सिल्व्हर, एक ब्रॉन्झ पदक केले प्राप्त
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब ज्युनिअर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट अकॅडमीने द्वितीय क्रमांक प्राप्त करून पाच खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जळगाव येथील अनुभती सेकंडरी स्कूल येथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या ९ खेळाडूंनी सहभाग नोंदवून पाच गोल्ड, तीन सिल्व्हर व एक ब्रॉन्झ पदक प्राप्त केले.
अंकिता उबाळे, मोहिनी राऊत, दिशा रणसिंग, काव्या साखरे, अभिमन्यू घोंगडे या खेळाडूंची २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निलेश मालकर, तुषार जाधव, मोहीनी सून्ने या खेळाडूंनी रौप्य पदक तर आरुषी कुमावत हिने कांस्य पदक प्राप्त केले आहे. यशस्वी खेळाडूंना सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत, भूषण मगरे, ईश्वर क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.