निरीक्षकांच्या उपस्थितीत लॉटरी सोडतीव्दारे इन-कॅमेरा ७६१ लाभार्थ्याची निवड
साईमत। जळगाव।प्रतिनिधी
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागविले होते त्यात एकूण ११७७पात्र अर्ज होते. त्यातून लॉटरी सोडतीतून ७६१ जणांची निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे,त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचेकडे प्राप्त झाल्याने, प्रवाशांची निवड करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ) आयोजित केला होता.
लॉटरी (ड्रॉ) साठी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समिती जळगाव यांच्यामार्फत जळगावच्या तहसिलदार श्रीमती शितल राजपूत, दै.साईमतचे संपादक तथा सामाजिक कायकर्ते प्रमोद बऱ्हाटे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातून एकुण ११७७ अर्ज पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या अर्जामधून लॉटरी सोडतीव्दारे निरीक्षकांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा ७६१ लाभार्थ्याची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे ३५ लाभार्थी व १२ सहायक असे एकुण ८०८ लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड केली आहे. निवड केलेल्या प्रवाशांची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव येथे प्रसिध्द केली आहे.