साईमत, जळगाव, प्रतिनिधी
शहरातील गणपती नगरात शहरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बाप-लेकाने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम पसार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा बाप- लेकांवर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणपती नगरातील संत सतरामदास मंदिरात शहरातील सिंधी कॉलनीतील श्याम वासुदेव करमचंदाणी हे सेवा करतात. त्यांचासोबत रात्रीच्या वेळ काही सहकारी सेवा करण्यासाठी येत असतात. मंदिराच्या परिसरात राकेश गोकुळ राठोड व त्याचे वडील गोकुळ हंसराज राठोड हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
शुक्रवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास मंदिरात मोठा आवाज झाला. त्यामुळे मंदिरात झोपलेले श्याम करमचंदाणी, अविनाश कापडी, प्रकाश पासवाणी, जवाहर तलरेजा यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी राकेश व त्याचे वडील गोकुळ राठोड हे मंदिरातील दानपेटी घेऊन जाताना दिसले. त्यांना आवाज दिला मात्र ते दोघे दानपेटी घेवून पसार झाले. त्यांनी मंदिराची पाहणी केली असता, मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसून आला.
याप्रकरणी अडीच हजारांची रक्कम लांबवल्याप्रकरणी सुरक्षा रक्षक राकेश राठोड व त्याचे वडील गोकुळ राठोड या दोघां पिता-पुत्राविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.