साईमत, चोपडा : प्रतिनिधी
जळगाव येथे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता रमाकांत बोरसे हिने “भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम” या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केले. तिने तालुक्यातून “प्रथम क्रमांक” मिळविला होता. जळगाव येथे जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावत विद्यालयाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
देशातील युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत करणे असे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद दरवर्षी विज्ञान मेळावा आयोजित करते. यावर्षीही हा विज्ञान मेळावा आयोजित केला होता. त्यात जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. प्राजक्ता रमाकांत बोरसे या विद्यार्थिनीने बनविलेल्या मॉडेलला जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यात सादरीकरण, लेखी क्षमता चाचणी, तोंडी चाचणी घेऊन निवड करण्यात आली.
यांनी केले कौतुक
प्राजक्ता बोरसे हिला श्रीमती आर.पी. शाह, एन.आर.पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड.संदीप पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, उपशिक्षणाधिकारी श्रीमती रागिनी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, समन्वयक आर.डी.साठे, मुख्याध्यापक एच.बी.मोरे, पर्यवेक्षक एस.एल.पाटील आदींनी कौतुक केले.