विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या सहलीची संधी
यावल (प्रतिनिधी)-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५२ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो सहलीसाठी संधी मिळाली आहे.
अहमदाबाद येथील इस्रो (विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर) आणि सायन्स सिटीला भेट देण्यासाठी हे विद्यार्थी रवाना झाले आहेत. आज या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सहलीचे अनुभव लेखी स्वरूपात पाठवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या सहलीसाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक वयोगटातून प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. १८ विद्यार्थी आणि ६ शिक्षक-कर्मचारी या सहलीसाठी रवाना झाले आहेत. विद्यार्थी रेल्वेने प्रवास करणार असून, परतीचा प्रवास विमानाने करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचा हा पहिलाच रेल्वे व विमान प्रवास असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांना इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. सायन्स सिटीमध्ये एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक उपक्रमांचा थेट अनुभव घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांची जिज्ञासा वाढावी आणि भविष्यात या क्षेत्रात त्यांनी स्वतःला सिद्ध करावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते.
भविष्यातही अशा उपक्रमांना चालना दिली जाईल, असा विश्वास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी व्यक्त केला. या सहलीचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, विश्वास गायकवाड आणि एल. एम. पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले.