साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक समाधान पाटील, प्रमोद पाटील, विष्णू हुसे, कांचन पाटील, शाळा समन्वयक डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील, दीपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांतील ज्ञानावर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. उपयोजित विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता. विविध आकर्षक व माहितीपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमाने दैनंदिन समस्यांवर उपाय प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुचविले. रेल्वे अपघात प्रतिबंधक यंत्रणा, लेसर सुरक्षा प्रणाली, स्मार्ट पूल, चांद्रयान ३, मेंदू, फुफ्फुस, मूत्रपिंड व हृदय प्रतिकृती, हेमोडायलिसिस कार्यरत प्रतिकृती, रोबोटिक कार, वायरलेस वीज प्रेषण प्रणाली, लाइन फॉलोअर रोबोट, स्मार्ट सिटी, हसत खेळत वीज निर्मिती,चंद्रग्रहण व सूर्यग्रहण, सूर्यमाला यांसारख्या विविध मॉडेल्सचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.
फुलपाखराचे जीवनचक्र, वाहतुकीची साधने, संवादाचे साधन, दातांचे विविध प्रकार, बिजांकुरण, जलचक्र यासारख्या विविध विषयांवर आधारित पोस्टर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या अनुषंगाने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली, फुले व फळे यांचे प्रतिनिधीत्व करणारा पोशाख परिधान केला होता.
प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक अर्चना जैन, विशाल मराठे, वैभव मराठे, सलोनी अग्रवाल, धनश्री पवार, कल्पना बारी, स्वरांगी अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आकर्षक रांगोळी काढण्यात आली. रांगोळीसाठी शिक्षिका अश्विनी ढबू आणि पूजा चौधरी या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता न्याती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालकांनी हजेरी लावली. सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका स्वरांगी अहिरे तर आभार अर्चना जैन यांनी मानले.