
विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल, देखावा, कलागुणांचे केले सादरीकरण
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
येथील एकमेव सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमित्त शाळेचे वार्षिक विज्ञान व कला प्रदर्शन तसेच लहान चिमुकल्यांसाठी आयोजित बालमेला उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, सचिव प्रकाश बोहरा, डायरेक्टर गौरव बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर विरेंद्र सखा यांच्यासह उद्योजक गोपाल अग्रवाल, सीए मुकेश चोरडिया, भगवान गंभीर पाटील, डॉ.दिपाली शेंडे, मनिषा सोनवणे, पीटीए मेंबर डॉ.योगेंद्र पवार, सुप्रिया बिऱ्हाडे, नितेश निकम, शुभांगी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते पंडित नेहरू, देवी सरस्वतींच्या प्रतिमेस पुष्पहार, पूजन, दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विज्ञान व कला सोबतच गणित, इंग्रजी, कॉम्प्युटर, इतिहास, भूगोल पर्यावरण आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल तयार करून सादर केली.
त्यासाठी विषय तज्ज्ञांना पर्यवेक्षक म्हणून आमंत्रित केले होते.प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आरोग्य, पर्यावरण, जीवन पद्धती, दळणवळण, आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी विषयाला अनुसरून पाण्याचे नियोजन, ग्लोबल वार्मिंग, सोलर सिटी, प्रदूषण नियंत्रण यावर मॉडेल सादरीकरणाने मान्यवरांचे लक्ष वेधले होते. प्री प्रायमरीच्या चिमुकल्यांनी बहिणाबाईचे गाव, ग्रामीण घरे, मातीची भांडी, पितळेची भांडी तसेच हायड्रोलिक रोबोट, ब्लड प्युरिफायर मॉनिटर, स्मार्ट नंबर सिस्टीम, इंग्लिश ग्रामर स्पीच पीपीटी व नवीन तयार झालेले भिवंडी येथील शिवरायांचे मंदिर, जलियनवाला बागवर सजीव देखावा तर अर्थक्वेक अलार्म, वेस्ट मॅनेजमेंट आदी आकर्षक मॉडेल सादर केल्याने याचेही विशेष कौतुक केले.
मान्यवरांनी प्रत्येक दालनात भेट देऊन सर्व मॉडेलची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे कौतूक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित केले. तसेच बाल मेळ्यात चिमुकल्यांसाठी जाम्पिंग जॅक, मिकी माऊस, मोटू पतलू आदींचा सलग दोन दिवस मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


