School Principal And Clerk : प्रसुती रजेसाठी लाच स्वीकारणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकासह लिपीकाला रंगेहाथ पकडले

0
2

सावदा पोलिसात गुन्हा दाखल, धुळे एसीबी विभागाची कारवाई

साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापिका मनिषा पितांबर महाजन (वय ५७) आणि कनिष्ठ लिपीक आशिष यशवंत पाटील (वय २७, दोन्ही रा.खिरोदा, ता. रावेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार यांची सून ही खिरोदा येथील एका विद्यालयात उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे. त्यांच्या सुनेने प्रसुती रजा मिळविण्यासाठी गेल्या २ जून २०२५ रोजी अर्ज दिला होता. तक्रारदारांनी सुनेच्या सांगण्यावरून मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ५ हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्यांसाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदारांनी सोमवारी, ७ जुलै रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केल्यावर मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ६ हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्यांचे ३६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता मुख्याध्यापिकांच्या कक्षात सापळा रचण्यात आला. यावेळी मनिषा महाजन यांनी तक्रारदाराकडून ३६ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. ती कनिष्ठ लिपीक आशिष पाटील याला मोजण्यासाठी दिली. त्याने ही रक्कम मोजत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, पो.कॉ. रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here