माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :
सावदा येथील नगरपालिका संचलित आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. १४ डिसेंबर रोजी १९७१-७२ मध्ये जुनी एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल ५३ वर्षांनंतर सुमारे ७५ माजी विद्यार्थी मित्र पुन्हा एकत्र आल्याने शाळा परिसरात आनंद, आपुलकी व आठवणींचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात बेंचवर बसून बालपणातील व शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले. शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन व त्या काळातील अनुभव कथन करताना अनेक क्षण भावूक करणारे ठरले.
या ऐतिहासिक स्नेहमेळाव्यासाठी कोचूर येथील सुधाकर चौधरी, मुंबई येथील चंद्रकांत पाटील व सावदा येथील प्रकाश पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या मित्रांचा शोध घेऊन त्यांची सध्याची नावे, पत्ते व मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क साधला आणि हा रम्य स्नेहमेळावा यशस्वीपणे घडवून आणला. या निमित्ताने मुंबई, नाशिक, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर तसेच सावदा व कोचूर येथून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुधाकर चौधरी, वाय. एम. पाटील (बाबा), प्रकाश पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, भानुदास भारंबे व माजी विद्यार्थी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. गं. हायस्कूलचे कलाशिक्षक नंदू पाटील यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश भालेराव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र भंगाळे व डॉ. अजितकुमार पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शाळेने दिलेले संस्कार व मूल्ये आयुष्यभर उपयोगी पडत असल्याचे मत व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवणींच्या स्वरूपात स्मरणिका व एक दिवा भेट म्हणून देण्यात आला. विशेष म्हणजे सर्वांनी एकत्र बसून पुन्हा शालेय दिवस जगण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर पाटील सर, एस. एम. महाजन सर, अनिल नेमाडे सर, अतुल सपकाळे, संजू न्हावी, उदय कोळी, श्रेयस जैन व अमित बेंडाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. स्नेहमेळाव्याचा समारोप पुन्हा भेटीच्या आश्वासनाने, आनंदी आठवणी व समाधानाने करण्यात आला.
