साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
१० वी चे बोर्डाचे पेपर संपताच विद्यार्थ्यांनी हॉटेल मध्ये पार्टी न करता निफाड येथील मानव बिबट सहजीवन केंद्राला भेट देत आपली सुट्टी साजरी केली.
१० वी चे वर्ष म्हणजे आयुष्याच्या शिक्षणाचा एक टप्पा पुर्ण होतो. हे पुर्ण वर्ष विद्यार्थ्यांकडे पालक व शिक्षक जास्त लक्ष देऊन अभ्यास करून घेत असतात, त्यामुळे १० वीचे पेपर संपल्यावर दुसऱ्या दिवशी विदयार्थी मोकळेपणाने खेळत आपला आनंद साजरा करतात मात्र चितेगांव तालुका निफाड येथील विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत श्री कृष्ण क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मानव बिबट सहजवीन केंद्र येथे भेट दिली.
नाशिक पुर्व वनविभाग व वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था जळगावं शाखा निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कृष्ण क्लासेस च्या विद्यार्थी व शिक्षकांना मानव बिबट सहजीवन व शून्य सर्प दंश जनजागृती अभियान बाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी मनमाड सहाय्यक वन संरक्षक डॉ सुजित नेवसे व येवला वनपरीक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड वनपाल भगवान जाधव यांनी बिबट रेस्कयू ऑपेरेशन विषयी सविस्तर माहिती दिली , वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे निफाड शाखा उपाध्यक्ष अमोल सोनवणे व श्रीकांत फड यांनी शून्य सर्पदंश अभियान व संघटक प्रमोद महानुभाव यांनी विविध प्रकारचे जंगल प्रकारातील वन्यजीव बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना बिबट, सापांचे माहिती पत्रक वाटप करण्यात आले.यावेळी वन कर्मचारी विजय माळी, शरद चांदोरे, भारत माळी व अन्य वन कर्मचारी तसेच श्रीकृष्ण क्लासेस चे शिक्षक योगेश भोज व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे चितेगांव व परिसरातील नागरिकांनी व पालकांनी कौतुक केले.
निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते तसे आता बिबट्याचा तालुका म्हणून देखील एक नवीन ओळख मिळत आहे. तालुक्यातील नैसर्गिक वातावरण बिबट प्राण्याला पुनरउत्पादन प्रक्रिये साठी अनुकूल आहे त्यामुळे त्यांची संख्या वाढत असतांना दिसत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिबट हल्यात मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला होता. विद्यार्थी शाळेत जात असतांना एकटे जात असतात त्यांना बऱ्याच वेळेस संध्याकाळी बिबट दिसला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत, विदयार्थ्यांना बिबट प्राण्याविषयीं माहिती मिळावी त्यांनी बिबट दिसताक्षणी शिक्षक व पालकांना माहिती द्यावी म्हणून बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांमध्ये रजिस्टर ठेवण्यात आले आहे,बिबट दिसल्यास विद्यार्थी शिक्षकांना सांगून रजिस्टर मध्ये नोंदणी करतात असा नवीन उपक्रम नाशिक पुर्व वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आला आहे.